भिगवण – येथील सायकल क्लबच्या सदस्यांकडून स्वत:चे आरोग्य जपताना निसर्गाचा ठेवाही जपण्याचे काम केले जात आहे. धकाधकीच्या जीवनात स्वतंत्रपणे व्यायामाची गरज प्रत्येकास वाटते. मात्र या व्यायामाच्या गरजेला योग्य दिशा आणि सामाजिक भान देऊन अनोखे काम करता येते, हे भिगवणच्या सायकल क्लबने दाखवून दिले. त्यांनी सायकल चलविता चलविता निसर्ग संवर्धनाचे व्रत जोपासले आहे.
मागील तीन वर्षांपासून दर शनिवारी सायकलवारी करीत एका नवीन ठिकाणास भेट द्यायची आणि सोबत काही देशी वृक्षांची रोपे घेऊन जायची. गेलेल्या ठिकाणी वृक्ष जोपासना करू इच्छिणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करायचे ही नेहमीची पद्धत आहे.
भिगवण आणि परिसरातील शाळा, फार्म हाऊस, ग्रामपंचायत कार्यालयाचा आवार, मंदीरे, स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी झाडे लावली आहेत. अशा प्रकारे सायकल क्लबने मागील तीन वर्षांत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक झाडांची लागवड केली आहे. एवढेच नव्हे तर लावलेल्या झाडांची जोपासनासुद्धा केली जाते. सायकल क्लबचा कटाक्षाने प्रयत्न असतो की, देशी जातीच्या झाडांचीच लागवड करायची. वाटसरूंना छाया देणारी वड, पिंपळ, गुलमोहर यांसारखी, तसेच आंबा, चिकू, सीताफळ, मोगरा, गुलाब यांसारख्या फळा-फुलांची रोपे विविध ठिकाणी लावली जातात.
शनिवारी खोर (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयास भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, नेचर फौंडेशनचे अध्यक्ष संजय चौधरी, केशव भापकर, अर्जुन तोडेकर, अल्ताफ शेख, रामभाऊ गुणवरे, औदुंबर हुलगे आदी सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी खोर गावातील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगवान चौधरी, गणेश साळुंखे, बाळासाहेब अर्जुन राजेंद्र रंधवे आदी उपस्थित होते. रियाज शेख, डॉ. अमोल खानावरे, अकबर तांबोळी यांसह पंचवीस सदस्य असून सर्वांच्या सक्रीय सहभागातून उपक्रम केला जातो.