‘जादा पैसे उकळणाऱ्या डॉक्‍टरांवर लक्ष ठेवा’- गृहमंत्री वळसे पाटील

मंचर  -शिनोली, अवसरी खुर्द येथील कोविड सेंटरची क्षमता वाढवावी. करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून खासगी डॉक्‍टर जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि.18) केली.

मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये तालुक्‍यातील करोना रुग्णांची स्थिती आणि उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी मुंबई येथून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तर पुण्यातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर ऑनलाइन सहभागी झाले होते.

मंचर येथील सभागृहात शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर, उपअभियंता प्रकाश शेडेकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. अंबादास देवमाने, प्राचार्य के. जी. कानडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, फक्‍त पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजे. करोना रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर पडता कामा नये. करोनाची स्ट्रेन्थ पॉवरफुल आहे. परिस्थिती गंभीर असल्याने नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. प्रत्येकाने काळजी घेतल्यास करोनाला हद्दपार करू शकतो. त्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ यांचा समन्वय हवा असून त्या पद्धतीने काम केल्यास करोनावर मात करणे शक्‍य आहे.

देवदत्त निकम म्हणाले की, आंबेगाव तालुक्‍यासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हेल्पलाइन सुरू करावी. त्या माध्यमातून खासगी, सरकारी हॉस्पिटलमधील बेडची स्थिती समजेल. तसेच रेमडेसिविर इंजेक्‍शन खासगी हॉस्पिटलवाले रुग्णांना बाहेरुन आणण्यासाठी सांगत असल्याने ते रोखणे गरजेचे असून खासगी रुग्णालयातच इंजेक्‍शन मिळेल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यावेळी डॉ. मोहन साळी, भुषण साळी, डॉ. श्रीरंग फडतरे, डॉ. रजनीश पोतनीस, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील यांनी ऑनलाइन पद्धतीने चर्चेत भाग घेत समस्या मांडल्या.

“ते’ कामकाजाच्या वेळी थांबत नाही
आदिवासी भागांत करोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराची मोठी गरज आहे. तसेच तलाठी, ग्रामसेवक कार्यालयीन कामकाजाच्यावेळी थांबत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या मुद्द्याकडे गृहमंत्र्यांचे लक्ष संजय गवारी यांनी लेक्ष वेधले.

डिंभे, शिनोली या आदिवासी गावांमध्ये शिवभोजन थाळी सुरू करावी. तसेच मंचर, अवसरी खुर्द, घोडेगाव ही गावे मोठी असल्याने तेथे करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच काही नागरिक गृहविलगीकरण झाले आहे. त्यांचे नातेवाइक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गावांत येतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढतो. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
– देवेंद्र शहा, अध्यक्ष, शरद बॅंक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.