बदलत्या घटनांवर नजर ठेवा

डॉ. घाणेकर : ए.आय.एस.एस.एम.एस.मध्ये “लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रम

पुणे – विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता कायमच जपली पाहिजे. समाजातील बदलत्या घटनांवर डोळस नजर ठेवा. त्याला अनुभवाची व अभ्यासाची जोड दिली तर उत्तम साहित्याची निर्मिती होऊ शकते. यासाठी तुम्ही माणसे वाचायला शिका, असे मत साहित्यिक डॉ. मधुसुदन घाणेकर यांनी व्यक्‍त केले आहे.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (ए.आय.एस.एस.एम.एस.) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “ऑथर मीट’ अर्थात “लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. एस. बोरमणे आदी उपस्थित होते. मराठी, इंग्रजी पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

भावना व्यक्त करण्यासाठी अनेक समाजमाध्यम उपलब्ध झाली आहेत. यातूनच उद्याचे साहित्य निर्माण होणार आहे; परंतु त्याच वेळी समृद्ध अशा साहित्याचा देखील अभ्यास करा. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सृजनशील लेखकांना आता चांगले दिवस आले आहेत. आता माध्यमे वाढली आहेत. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, रेडिओ, टीव्ही, नाटक सिनेमा याबरोबरच आता वेब सिरीज, ब्लॉग रायटिंग, टेक्‍नीकल रायटिंग, मालिका व चित्रपटासाठी लिखाण असे अनेक पर्याय निर्माण झाले आहेत, असे साहित्यिक अभिजित पेंढारकर यांनी सांगितले आहे. क्रिएटिव्ह रायटिंग क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो, असे डॉ. बोरमणे यांनी सांगितले आहे. ग्रंथपाल डॉ.वृषाली दंडवते यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.कुलकर्णी यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.