केडगावकरांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात

भाजपचे नगरसेवक प्रचारापासून लांब

नगर – महापालिका निवडणुकीमध्ये केडगावमधील बदलले राजकीय समीकरण लोकसभा निवडणुकीत मात्र दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होते आहे. त्यामुळे सध्या तरी केडगावकरांची भूमिका गुलदस्त्यात आहे. केडगावमधील भाजपचे नगरसेवक अद्यापही प्रचारापासून लांब दिसत आहे. शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी मात्र प्रचारात सक्रिय झाले आहेत.
कॉंग्रेसचा बालकिल्ला असलेला केडगावामध्ये आज कॉंग्रेस औषधाला देखील उरली नाही. शिवसेनेने या भागात चांगल्या पद्धतीने शिरकाव केला. तरी कॉंग्रेसचे वर्चस्व केडगावमध्ये होते. परंतू डिसेंबरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत झालेल्या राजकीय भूकंपामुळे कॉंग्रेसचे अस्तित्वच संपुष्ठात आले.

कॉंग्रेसचे नगरसेवकासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केडगावमध्ये माजी शहरजिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर यांचा बालेकिल्ला. ते सांगतील तीच पुर्व दिशा केडगावमध्ये होत. परंतू कोतकर पिता-पुत्रांना खूनाच्या आरोपावरून जन्मठेप झाल्यानंतर येथील कॉंग्रेस डळमळीत झाली. महापालिका निवडणूक कॉंग्रेस सध्याचे विद्यमान भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली लढविली होती. त्यावेळी डॉ. विखे यांनी केडगाववर मोठी भिस्त ठेवून उमेदवार निश्‍चित केले. परंतू त्यांनाही विश्‍वासात न घेता कोतकर समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे डॉ. विखे अडचणीत सापडले होते. ऐनवेळी त्यांना केडगावमधील आठ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार उभे करावे लागले. त्यामुळे त्यांची चांगलीच कसरत झाली होती.

महापालिका निवडणुकीत भाजपने चार जागा केडगावमध्ये मिळाल्या. परंतू कॉंग्रेसच्या उमेदवारांची अनामत रकम देखील जप्त झाली. अशी अवस्था कॉंग्रेसची झाली. परंतू त्यानंतर ज्या काही विद्यमान नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते पराभूत झाल्यानंतर पुन्हा डॉ. विखेंच्या गोठात आहे. म्हणजे त्या माजी नगरसेवकांनी कॉंग्रेसचे काम सुरू केले होते. परंतू त्यानंतर डॉ.विखे हे भाजपमध्ये आहे. लोकसभेचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले आहे. पण केडगावमधील भाजपचे नगरसेवक व माजी नगरसेवक अद्यापही डॉ.विखेंच्या प्रचारकडे फिरकले नाही. कोतकर समर्थक प्रचारापासून अलिप्त आहेत. अर्थात कोतकर व राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप हे व्याही आहेत.

नातेसंबंध असल्याने कोतकर समर्थकांनी अद्यापही कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप की डॉ. विखे याबाबत कोणताही पर्याय निवडला गेलेला नाही. तसे पाहिले तर कोतकर समर्थक हे डॉ. विखेंचे कट्टर समर्थक होते. परंतू महापालिका निवडणुकीनंतर बदलले राजकीय समिकरणामुळे कोतकर समर्थक डॉ. विखेंपासून दुरावले होते. पण आता डॉ. विखेंच भाजपमध्ये आल्याने कोतकर समर्थकांनी पक्ष म्हणून प्रचारात सक्रिय होणे अपेक्षित आहे. परंतू त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.