शेवगाव – तालुक्याच्या पूर्व भागातील ऊसतोड कामगारांचा सहकारी साखर कारखाना म्हणून लौकिक असलेल्या संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक काल अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी 19 जागेसाठी 40 इच्छुकांनी 49 उमेदवारी अर्ज दखल केले होते. मात्र, 29 इच्छुकांनी अगोदरच आपले अर्ज मागे घेतले.
आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्यादिवशी एकाने आपला अर्ज मागे घेतल्याने केदारेश्वरच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. प्रवीण लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक निबंधक लकवाल व जी.ए.विखे यांनी मदत केली. उत्पादक मतदारसंघात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष ऍड.प्रतापराव ढाकणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अगोदरच बिनविरोध निवड झाली होती.
बिनविरोध झालेल्या गटनिहाय मतदारसंघ निहाय संचालकाची नावे अशी – सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासद मतदारसंघ बोधेगाव – प्रकाश गंगाधर घनवट, बाळू ज्ञानोबा फुंदे. हादगाव गट- भाऊसाहेब दादासाहेब मुंडे, सुरेशचंद्र विश्वासराव होळकर व अशोक निवृत्ती तानवडे. मुंगी गट- बापूराव भानुदास घोडके, श्रीमंत रंगनाथ गव्हाणे व रणजीत पांडुरंग घुगे. चापडगाव गट – पांडुरंग हरिभाऊ काकडे, शिवाजी विश्वनाथ जाधव व सदाशिव हरिभाऊ दराडे. हसनापूर गट – ऋषिकेश प्रताप ढाकणे, माधव भीमसेन काटे.
उत्पादक सहकारी संस्था गट – प्रताप बबनराव ढाकणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी सुभाष कचरू खंडागळे. महिला प्रतिनिधी – मीनाताई संदीप बोडखे, सुमनबाई मोहन दहिफळे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी- तुषार शिवनाथ वैद्य. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग प्रतिनिधी- त्रिंबक दत्तू चेमटे. सर्वांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मंडळाचे नेते ऍड.प्रतापराव ढाकणे यांच्या हस्ते निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांचा व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
केदारेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज फक्त 19 जणांचे अर्ज राहिले आणि कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. मी सर्व बिनविरोध संचालकाचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या अर्जदारांनी आमच्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून अर्ज मागे घेतले आणि ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, असे ऍड. प्रतापराव ढाकणे म्हणाले.