ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांचं सत्र एकीकडे सुरु असताना आता उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ठाकरेंकडून 65 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदेच्या विरोधात कोणाला उमेदवारी देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेच्या विरोधात आपला उमेदवार जाहीर केला आहे.
‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेच्या विरोधात केदार दिघेंना उमेदवारी देण्यात आली आहे. केदार दिघे हे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे असून शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार आहेत.
ठाकरेंचा मास्टर प्लॅन
उद्धव ठाकरे यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंना मुख्यमंत्री शिंदेच्या विरोधात उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली आहे. या लढतीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांच्यावर मात करण्यात यशस्वी होणार का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. पक्षातून बंड केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक नक्कीच सोप्पी नसणार आहे.