मुंबई – टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजेच, “कौन बनेगा करोडपती’चा 12 वा सीजन सध्या महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला स्क्रीनवर पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद होत आहे.
दरम्यान, कौन बनेगा करोडपतीच्या12 व्या सीझनमधील पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. नुकतंच या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, अद्याप हा एपिसोड टेलिकास्ट झालेला नाही. स्पर्धक नाजिया नसीम या सीझनच्या पहिल्या करोडपती बनल्या आहेत.
प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नाजियाने एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. याआधी अनेक स्पर्धक एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले, पण कोणीच एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकलं नाही.