कविता राऊत अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत

डावलले गेल्याबद्दल नाराजी, राज्यपालांची घेतली भेट

मुंबई  – राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही शासकीय सेवेत सामावून घेतले जात नसल्याबद्दल राज्याची प्रसिद्ध धावपटू कविता राऊतने नाराजी व्यक्‍त केली आहे. सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन देखील पाळले गेले नसल्याने तीने अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्‍त केली आहे.

खेळाडूंच्या कोट्यातून सरकारी नोकरी देण्याचे तिला आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, तिच्यानंतर ज्यांनी कामगिरी केली त्यांना नोकरीत सामावून घेतले जात आहे मात्र, आपल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असे गाऱ्हाणे तिने राज्यपालांकडे मांडले. तीने याबाबत राज्यपालांकडे सविस्तर निवेदनही दिले आहे.

मि अनुसूचित जमातीतील असून भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करताना राष्ट्रकुल, आशियाई तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळविले आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला होता. शासनाचे विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे.

2014 मध्ये थेट शासकीय सेवेत क्‍लास वनची नोकरी मिळावी म्हणून अर्ज केला होता. शासनाच्या निर्णयानुसार आपण शासकीय सेवेत थेट वर्ग एकच्या पदासाठी पात्र आहोत. परंतु नंतर सातत्याने मला डावलले गेले आहे, असे तीने या निवेदनात नमूद केले आहे. आदिवासी भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर सरस कामगिरी केल्यानतरही मला का डावलले जाते, अशी विचारणाही तीने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.