बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच साउथ स्टार विजय सेतुपति याच्यासोबत एकत्रित काम करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कतरिना आणि विजय यांच्या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे दोन्ही कलाकार दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
श्रीराम यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे नाव “मेरी ख्रिसमस’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. हा चित्रपट एका शॉर्ट फिल्मवर आधारित असून याची कथा पुणे शहराच्या आसपास रचण्यात आली आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच कतरिना आणि साउथचा सुपरस्टार विजय यांची जोडी स्क्रीन शेअर करणार आहे.
हा चित्रपट केवळ 90 मिनिटांचा असणार आहे. वास्तविक या चित्रपटाची कथा अशा पद्धतीने लिहिण्यात आली आहे, ज्यामुळे चित्रपटात मध्यांतर असणारच नाही. श्रीराम यांचा हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फॉर्मेटसारखा असणार आहे.
“मेरी ख्रिसमस’चे शूटिंग पुणे आणि मुंबईतील काही ठिकाणी करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 30 दिवसांत पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे. रमेश तौरानी द्वारा निर्मित आणि “मुंबईकर’नंतर विजयचा हा दुसरा बॉलीवूडमधील चित्रपट आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कतरिना कैफ “फोन भूत’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ती या प्रोजेक्टचे काम सुरू करणार आहे.