Katrina Kaif Haircare Tips: अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे सर्वात लोकप्रिय बॉलिवूड कपल्सपैकी एक आहेत. दोघेही आपल्या चित्रपटांसोबतच कुटुंबासोबतच्या नात्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. प्रामुख्याने कतरिनाकडून नेहमीच सासरच्या मंडळीबाबत कौतुक केले जाते. तसेच, सासूसोबतच्या नात्याबाबतही अभिनेत्रीकडून वेळोवेळी भाष्य केले जाते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये कतरिनाने तिच्या सुंदर केसामागचे रहस्य सांगितले. विशेष म्हणजे सुंदर केसांमागे तिच्या सासुबाईंचा विशेष हात आहे.
कतरिनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, घरातील वस्तूंपासून तिची सासू केसांसाठी खास तेल बनवते. अभिनेत्रीने आपल्या स्किनकेअर रुटिनबाबत माहिती देताना सांगितले की, माझ्या सासूबाई माझ्यासाठी केसांसाठी खास तेल बनवतात. या तेलामध्ये कांदा, आवळा, अवेकाडो आणि आणखी दोन तीन पदार्थांचा समावेश असतो. हे तेल खूपच प्रभावी असून, याचा फायदा देखील होतो.
आपण त्वचेची देखील विशेष काळजी घेत असल्याचे तिने यावेळी सांगितले. कतरिना म्हणाली की, मला स्किनकेअर आवडतं, कारण माझी त्वचा खूपच सेंसेटिव्ह आहे. मला गुआ शा (त्वचेची काळजी घेण्यासंदर्भातील चायनीज पद्धत) पद्धत आवडते. मी आताच या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, कतरिना व विकीने डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले होते. कतरिना सोशल मीडियावर देखील सासूसोबतचे फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच दोघींनी शिर्डीला साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तिच्या कामाबद्दल सांगायचे तर ती शेवटची ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसली होती.