कात्रजची विनापरवाना मंडई “करोना स्पॉट’

लॉकडाऊनचे सर्व नियम पायदळी तुडवीत रस्त्यालगत बसून विक्री

कात्रज  (प्रतिनिधी) – कात्रज परिसरामध्ये स्वारगेट-सातारा मुख्य रस्त्यावर सकाळी 6:00 पासून सुमारे 70 ते 80 भाजीविक्रेते कात्रज चौकापासून हॉटेल किनारापर्यंत येथे विनापरवाना रोज मंडई भरवित आहेत. येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने यातून कोरानाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता आहे. पोलिसांनी याकामी लक्ष द्यावे, अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.

कात्रज परिसरामध्ये सकाळी भरणाऱ्या या बेकायदा भाजी मंडईत विक्रेत्यांकडून कोणतेही नियम पाळले जात नाहीत. रस्त्याकडेला मिळेल त्या जागी हे विक्रेत बसलेले असतात. दोन भाजी विक्रेत्यांमध्येही विशिष्ट अंतर नसते, शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळताच भाजी विक्री केली जात आहे. सकाळीच्या वेळी नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे काही विक्रेते तसेच नागरिक मास्क लावत नाहीत. यामुळे विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्‍यता आहे. अनेक भाजी विक्रेते विनापरवाना भाजी विक्री करीत असून त्यांच्याकडून लॉकडाऊनचे सर्व नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

पोलीस प्रशासन तसेच पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचेही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. यातून येथे दिवसेंदिवस भाजीविक्रेत्यांची गर्दी वाढत आहे. कात्रज परिसरात भरणाऱ्या मंडईमुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्‍यात येवू शकतो. कात्रज परिसरामध्ये करोना रुग्ण आढळलेला नसला तरी भाजीविक्रीच्या ठिकाणी नियम मोडले जात असतील तर यातून कोणतीही व्यक्ती बाधित होण्याचा धोका आहे. यामुळे या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांना शिस्त लावावी किंवा ही मंडई तरी बंद करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.