बिबट्याच्या बछड्याची होणार कात्रजला रवानगी

कराड – कराड तालुक्‍यातील काले येथील चौगुले मळ्यात मंगळवारी ऊसतोड सुरू असताना सापडलेल्या दोन बछड्यांपैकी एकाचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. तर जिवंत सापडलेल्या बछड्यावर उपचार करण्यात आले असून त्याची कात्रजच्या बिबट्या निवारण केंद्रात रवानगी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काले येथील जयकर बाबुराव पाटील यांच्या उसाच्या शेतात तोड सुरू असताना मंगळवारी दोन बिबट्याचे बछडे आढळून आले होते. यातील एका बछड्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या तपासणीत समोर आले. तर जिवंत असलेला दुसरा बछडा अशक्त असल्यामुळे त्याच्यावर उपचार करीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हिंगमिरे व कराडचे वनअधिकारी डॉ. अजीत साजणे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

सदरच्या बछड्याला मंगळवारी रात्रीपासून चौगुले मळ्यात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. या बछड्याच्या शोधार्थ मादी बिबट्या येईल, असा अंदाज होता. तसेच हालचाली टिपण्यासाठी याठिकाणी वनविभागाने कॅमेराही लावला होता. मात्र मादी बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशक्त बछड्याला शेळीचे दूध दिले. हा बछडा आता सशक्त असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगीतले असून या बछड्याची पुणे येथील कात्रज उद्यानातील बिबट्या निवारण केंद्रात रवानगी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.