कात्रज भाजी मंडई “करोना हॉटस्पॉट’

भाजीविक्रेते आणि ग्राहकांकडून सुरक्षिततेचे नियम मोडत गर्दी

कात्रज – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे राज्य शासनाने निर्णय घेत दि. 22 एप्रिलपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण शहरामध्ये टाळेबंदीचा निर्णय घेतला. त्यामध्ये बदल करीत सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये अत्यावश्‍यक सेवेतील दूध डेअरी, अन्नपदार्थ, भाजीपाला यांना परवानगी देण्यात आली. मात्र, हे सर्व व्यावसायिकांना करोना संदर्भातील सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे, सॅनिटायझर यांचा वापर बंधनकारक करण्यात आलेले असताना कात्रज परिसरातील मंडईत मात्र हे सर्व नियम धुडकावून बाजार भरविला जात आहे.

करोना सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत नागरिक तसेच व्यापारी, दुकानदार टाळाटाळ करीत असल्याने तसेच याबाबत प्रशासनही उदासीन असल्याचे दिसत आहे. यातूनच कात्रज परिसरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कात्रज येथील भाजी मंडई परिसरामध्ये भाजीविक्रेते रस्त्यावरच सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये बसलेले असतात. या ठिकाणी सुमारे 100 ते 150 विक्रेते “बाजार’ भरवितात.

कात्रज परिसर, दत्तनगर, अंजनीनगर, संतोषनगर, सुखसागरनगर, राजस सोसायटी तसेच आसपासच्या इतर सोसायटीतील नागरिक या ठिकाणी गर्दी करत असतात. या वेळी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क अशा सुरक्षा साधनांचा वापर व्यवस्थित केला जात नाही. भाजीविक्रेते सर्रास नाकाखाली मास्क लावत असतात.

कात्रज भाजी मंडईकडून संतोषनगर व सच्चाई माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील अनेक भाजीविक्रेते, तसेच अनेक प्रकारची अत्यावश्‍यक सेवाव्यतिरिक्‍त दुकाने सकाळच्या वेळेत अर्धवट शटर उघडून सुरू ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. याकडे महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असून, यातूनच मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.