संजय कडू
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्याची धमकी देऊन कात्रज भागातील हाॅटेलचालकांकडून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
निखिल सुनील शिंदे (वय ३०), सिद्धार्थ राहुल रणपिसे (वय २८, दोघे रा. समता सोसायटी, सहकारनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत विश्वनाथ पद्मनाभ पुजारी (वय ५७, रा. अमित ॲस्टोनिया, आंबेगाव-नऱ्हे रस्ता, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुजारी यांचे कात्रज परिसरात जंक्शन बार आहे. आरोपी शिंदे, रणपिसे कात्रज चौक परिसरातील रेस्टोरंट आणि बारचालकांना भेटले. तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहेत. पार्किंग व्यवस्था नसल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्यात येणार आहे, अशी धमकी आरोपींनी दिली.
पुजारी यांच्यासह कात्रज भागातील हाॅटेल, बारचालकांना धमकावून त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुजारी यांच्यासह अन्य हाॅटेलचालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुजारी यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या शिंदे आणि रणपिसे यांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.