कदमांकडून राष्ट्रवादीला कात्रजचा घाट

सभापती साधना कदम यांचा पुन्हा यु-टर्न
सभापती निवडीच्या दिवशी मी नवीन असल्याने गैरसमज
मी भाजपचीच; शिवसेना-भाजपच्या सहकार्याने सभापती : कदम
कर्जत –
दोन दिवसांपूर्वी सभापतीच्या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या गोठात दाखल झालेल्या कर्जत पंचायत समितीच्या सभापती साधना कदम यांनी आपण भाजपच्या असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रवादीच्या खेळीला पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखविला आहे. आपण भाजप-शिवसेनेच्या सहकार्यानेच कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असून आपण भाजपचेच आहोत. यापुढे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपतच काम करणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य तथा नवनिर्वाचित सभापती साधना कदम यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली.

कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड 20 रोजी झाली. अगोदर एक दिवस आधी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भाजपत प्रवेश केलेल्या साधना कदम यांनी निवडीनंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात जात सत्कार स्वीकारुन भाजपला धक्का दिला होता. मात्र आज सभापती साधना कदम यांनी पुन्हा यु-टर्न घेत आपण सोमवारी भाजप आणि शिवसेनाच्या साह्याने सभापती झालो असल्याचे पुनरोच्चार पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करू दुसऱ्या दिवशी निवडीनंतर कदम भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ओळख न देताच सरळ राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कुळधरणला गेल्या होत्या. परंतू त्यांनी आज अचानक ही भूमिका जाहीर केल्याने कोणता चमत्कार झाला, याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होते आहे.

कदम म्हणाल्या, आपण पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेत चोंडी येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. 20 मे रोजी सभापती निवडीसाठी शिंदे यांनी आपले नाव पुढे करत भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांना पाठींबा देण्याची सूचना केली. त्या सुचनेनुसार सोमवारी सभापती निवडीप्रसंगी आपल्या नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत तर अनुमोदन म्हणून भाजपचे सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांची स्वाक्षरी होती. एकमेव अर्ज असल्याने आपली बिनविरोध निवड झाली आहे.

यापुढे आपण पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका भाजपमध्ये व सभापती म्हणून कर्जत तालुका पंचायत समितीमध्ये काम करणार आहे.ना. राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारणार असल्याचे म्हटले. सभापती निवडीच्या दिवशी मी नवीन असल्यान गैरसमज झाला, असेही कदम म्हणाल्या. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, शहराध्यक्ष रामदास हजारे, मनीषा वडे, डॉ.कांचन खेत्रे, अंकुश कदम, रामकिसन साळवे, विक्रम राजेभोसले, विक्रांत ढोकरिकर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)