कटिहार – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय झाला. त्या आनंदात फटाके फोडणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर हत्येनंतर मृतदेह झाडावर लटकवल्याची धक्कादायक घटना कटिहार भागात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रंजीत कुमार (वय-18, रा. गोपालपट्टी, कटिहार) असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना फलका पोलिस स्टेशनच्या हद्दीत गोपालगट्टी गावात मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
रंजीत कुमार यांचे वडिल दिनेश मुनी हे भाजपा बुथ अध्यक्ष आणि वार्ड सदस्य आहेत. दिनेश मुनी यांनी सांगितले की, विजयाच्या आनंदात रंजीत फटाके फोडत होता. यामुळे परिसरातील काही लोकांना याचा त्रास झाला. त्यानंतर बुधवारी सकाळी दर्गा बहियार येथील झाडावर रंजीतचा मृतदेह लटकवल्याचे दिसले. बिहारमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्याच्या आनंदात फटाके फोडल्याने गावातील काही तरूणांमध्ये वाद झाला होता. त्याच लोकांनी माझ्या मुलाची हत्या केली असा आरोप मृत रंजीत कुमार यांचे वडिल आणि भाजपा बुथ अध्यक्ष दिनेश मुनी यांनी केला आहे.
मृत रंजीतच्या अंगावर मारहाण केल्याने जखमा झाल्याचे दिसत आहे. घटनेनंतर फलका पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुनील कुमार मंडल यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रकटिहार रूग्णालयात पाठवला. पुढील तपास सुरू आहे.