जम्मू -संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कठुआ प्रकरणाची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. आता त्या प्रकरणी 10 जूनला निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जानेवारीत कठुआमध्ये एका आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घूण हत्या करण्यात आली. त्या प्रकरणात गावप्रमुखासह आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
त्या प्रकरणाची सुनावणी जम्मू-काश्मीरबाहेर घेण्याचा आदेश मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर शेजारील राज्य असणाऱ्या पंजाबच्या पठाणकोटमध्ये ती सुनावणी झाली. आता ती सुनावणी पूर्ण झाल्याने निकालाबाबत प्रतीक्षा आहे. आरोपींना दोषी ठरवण्यात आल्यास किमान जन्मठेपेची आणि कमाल फाशीची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.