गुळुंचे येथे काटेबारस यात्रेची तयारी पूर्ण
नीरा – गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ज्योतिर्लिंगाची “काटेबारस’ यात्रेनिमित्त मंदिर परिसरात शेकडो समया गेल्या बारा दिवसांपासून तेवत ठेवल्या आहेत. शनिवारपासून (दि. 9) मुख्य यात्रेला प्रारंभ होणार आहे. दीपावलीच्या प्रतिपदेला (पाडव्याला) सकाळी दहा वाजता स्वयंभू शिवलिंगाची पूजा झाली. महाआरती झाल्यावर मंदिरात गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रमुखांनी प्रत्येकी एक समई पेटवली.
घरटी एक समई याप्रमाणे सुमारे 300 समया गेल्या बारा दिवस-रात्र अखंडपणे तेवत आहेत. परगावी असलेल्या माहेरवाशीण नियमितपणे तेल वाहतात. विशेषत: सर्व समया पितळेच्या आहेत. देवाचे गुरव प्रशांत शिंदे व त्यांचे कुटुंबीय दररोज सकाळ-संध्याकाळ तेवत असणाऱ्या समयांमध्ये भक्तांनी दिलेले तेल वाहतात.
पहाटे काकडा आरती, सायंकाळी भजन-कीर्तन व ढोल-लेझीमच्या खेळात गावातील गावकरी देवाची पालखी घेऊन गावात जातात. तिथे आरती करून परत माघारी मंदिरात येतात असा दिनक्रम बारा दिवस चालतो. शनिवारी (दि. 9) होणाऱ्या मुख्य यात्रेसाठी शुक्रवारी (दि. 8) उत्सव मूर्तींना नीरा नदीच्या दत्तघाटावरील पवित्र तीर्थात स्नान घालण्यात येणार आहे. पालखी रथाला उजाळा देण्यात आला आहे. ज्योतिर्लिंग मंदिराचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख मानकरी मधुकर निगडे, पोपट निगडे, जयसिंग निगडे, जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष गोरख निगडे, विजय निगडे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.