ज्योतिर्लिंगाची काटेबारस यात्रा उत्साहात साजरी
नीरा – हर भोले…हर हर…महादेव…ज्योतिर्लिंग महाराज की जय…या गगनभेदी जयघोषात भक्ती आणि शक्तीची प्रेरणा देणाऱ्या श्री ज्योतिर्लिंगाची यात्रा उत्साहात साजरी झाली. भगवान शिवाप्रती असलेल्या श्रद्धेने बाभळीच्या काटेरी ढिगावर भाविकांनी उड्या घेतल्या. उघड्या अंगाने काटेरी ढिगावर लोळणारे भक्तपाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत राज्यासह परराज्यातील शिवभक्त उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावचे ग्रामदैवत असलेल्या ज्योतिर्लिंग महाराजांची यात्रा दिवाळी पाडव्याला सुरुवात झाली होती. प्रतिपदेला घट स्थापना झाल्यानंतर काकड आरती, शिवनाम जप, ध्यान, आरत्या, शिवालीलामृताचे पठण, भजन, कीर्तन सुरू झाले होते. गुरुवारी (दि. 7) रात्री देवाची पालखी उत्सव मूर्तीसह ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी छबिन्यासह निघाली. एकादशीला (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता पालखीतून उत्सव मूर्ती व मानाच्या कठीला नीरा नदीत स्नानासाठी नेण्यात आल्या. दुपारी दीडच्या सुमारास मूर्ती व काठीला प्रसिद्ध दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. नीरा बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी पालखी गुळुंचे गावात दाखल झाल्यानंतर दोन्ही पालख्या गायकवाड वस्तीतील विसावा स्थळावर विसावल्या. रात्री किर्तन संपल्यावर छबिन्याला सुरुवात केली गेली. शनिवारी द्वादशीला पहाटे चार वाजता शिवभक्तांनी मंदिरा शेजारील ओढ्यात अंघोळ करून गावाबाहेरील मानाच्या कठीचे दर्शन घेऊन मंदिरातपर्यंत दंडवत घातले. गुळुंचे गावासह बारा वाड्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. अकराच्या सुमारास मंदिरासमोर ढोलांचा आवाज घुमू लागला, भक्त मोठ्या उत्साहात छबिन्याच्या खेळ खेळू लागले.
ढोल, ताशे व झांजेच्या कडकडाटात अवघा आसमंत दुमदुमला होता. भक्तांनी एकमेकांवर मुक्तपणे गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत “हर भोला हर…महादेवाची’ गर्जना केली. साडेअकरा वाजता मंदिरातून उत्सव मूर्तीसह दोन्ही पालख्या गावाबाहेरील काठीच्या भेटीसाठी वाजत गाजत निघाल्या. यावेळी छबिन्यात आडवा डाव खेळला गेला. पालख्यांनी गावाबाहेरच्या काठीला प्रदक्षिणा करीत आरती घेण्यात आली.
काट्यावर भाविकांची मुक्तपणे लोळण –
ज्योतिर्लिंग महाराज मंदिरा समोर मानकऱ्यांनी डोक्यावर बाभळीच्या काट्यांच्या फास जमा केले. ट्रकभर काटेरी फास गोलाकार पद्धतीने मांडला गेला. काटेरी ढिगा भोवती पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्या बरोबर शिवभक्तांनी शक्ती आणि भक्तीच्या जोरावर हर भोले हर हर महादेवच्या जयघोषात काटेरी फासावर एका मागून एक उड्या मारुन देवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. सुमारे दीड तासांत 165 भक्तांनी काट्याच्या ढिगांवर मुक्तपणे लोळण घेतली.
काही भक्तांनी एक दोन तर काहींनी अक्षरशः पाच उड्या घेतल्या. काटेरी ढिगावर उघड्या अंगाने लोळणारे भक्त पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. भगवान शिवप्रती असलेली भक्तांची असीम श्रद्धा यावेळी दिसून आली. काट्यांवर मुक्तपणे लोळल्यानंतर भक्तांना मंदिरात घेऊन जात होते. यात्रेत युवकांनी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. शेवटच्या भक्ताने उडी मारल्यानंतर काटेरी फास जाळुन टाकण्यात आले व यात्रेची सांगता झाली.