– जयंत माईणकर
सलमान खानच्या घरावरील गोळीबार, बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता सैफ अली खानवरील हल्ला! तीनही घटनांचे धागे एकमेकांशी गुंतलेले आहेत? कारण सलमानप्रमाणेच सैफवरही काळवीट शिकार करण्याचा आरोप झाला होता.
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (30) ऊर्फ विजय दास बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या तरी त्याचा चोरीचा उद्देश होता, असे प्रथमदर्शनी दिसते. तो बांगलादेशातून मुंबईत आला होता. काहीकाळ मुंबईतील वरळी कोळीवाड्याशेजारी असलेल्या जनता कॉलनी येथे वास्तव्याला होता, अशी माहिती समजली आहे.
हा मुद्दा बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आवाज उठवण्याची भाजपला संधी! गेली अकरा वर्षे भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे घुसखोरीबद्दल काँग्रेसला जबाबदार धरण्यापेक्षा भाजपने स्वतःच्या काळात काय केले हे सांगणे जास्त संयुक्तिक ठरेल. त्यातच सैफ अली खान आणि त्याचे आयुष्य म्हणजे एका टाइपच्या ट्रोलकर जमातीसाठी अक्षरशः भांडार आहे. पतौडी घराण्याचा छोटा नवाब म्हणून जन्म. वडील मुस्लीम संस्थानिक तर आई रवींद्रनाथ टागोरांची नात! सैफला दोन पत्नीपासून चार मुले! अर्थात याबद्दल त्याला ट्रोल करण्याचा किंवा दोष देण्याचा अधिकार कोणालाही नाही. माजी भाजप खासदार अभिनेते धर्मेंद्र यांनाही दोन पत्नी, दोन मुले, चार मुली आहेत. याच मांदियाळीत बोनी कपूर, महेश भट, आमिर खान यांचाही समावेश आहे. त्यामुळे यासाठी केवळ सैफला ट्रोल करणं त्याच्यावर अन्याय करणारं म्हटलं पाहिजे.
मिश्र धर्मीय लग्नात मुले आईचा धर्म असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात हे माझं निरीक्षण! सैफ, सोहा अगदी अमृता सिंग यांना हे लागू आहे. तसेच कोणी कुठे लग्न करावं हाही ज्याचा त्याचा प्रश्न असताना कोणीतरी कुमार विश्वास घराचे नाव रामायण असताना घरातील लक्ष्मी कोणीतरी दुसराच घेऊन जाईल असं म्हणतो तेव्हा याचा संबंध केवळ शत्रुघ्न आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याशीच असतो. असं ट्रोल होणं साहजिक असेल तरीही अयोग्य आहे. सैफची पहिली बायको अमृता सिंगचे वडील शीख तर आई मुस्लीम! दुसरी बायको करिना कपूर हिंदू. करिनाच्या लग्नाबाबत काही प्रमाणात ‘कुजबुज मोहिमे’ने तेव्हासुद्धा आक्षेप घेतलेला होता.
सैफ आणि करिना यांच्या मुलाच्या नावावरून प्रचंड गहजब झालेला होता. त्यांनी मुलाचे नाव हिंदुस्तानवर आक्रमण करून हजारो लोकांची कत्तल करणारा तैमूर याचे ठेवले, हे पाहून बर्याच हिंदुत्ववादी लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. तैमूर हा छोटा मुलगा म्हणजे डिजिटल भारतातील ऑनलाइन लिंचींगचा पहिला बळी म्हटला पाहिजे. ट्रोलर गँगने तैमूर नावाबद्दल टीकेची झोड उठवली. ‘तैमूर’ या नावाचा अर्थ लोखंडासारखा मजबूत असा टर्को-मंगोल भाषेत होतो. पण आजच्या उझबेकिस्तानमध्ये मध्ययुगीन काळात जन्मलेला तैमूरलंग नावाच्या एका सम्राटाने भारतात येऊन अत्याचार केले म्हणून ट्रोलर त्या नावाला विरोध करत होते. म्हणजे एखाद्या मुलाचंही नाव ट्रोल करणार्यांनीच ठरवावं का?
सैफ आणि करिनाने आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचं, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पतौडी हे एक संस्थानिक नवाबी घराणे… जे फाळणीनंतर भारतीय मातीशी इमान राखून इथे राहिलं. याच मन्सूर अली खान पतौडी यांचा चुलतभाऊ पाकिस्तानात कायमचा स्थायिक झाला… एवढंच नाही तर तो पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा चीफ म्हणून सेवानिवृत्त झाला. कारण, बहुतांशी मुस्लीम अमीर उमराव, नवाब, राजे राजवाडे यांनी पाकिस्तानात जाणे पसंद केलं होतं. पण मन्सूर अली खान पतौडी कुटुंबीय भारतातच राहिले.
शर्मिला पुत्र सैफने सात फिल्मफेअर अॅवार्ड, एक नॅशनल अॅवार्ड, पद्मश्री आणि इतर बरेच अॅवार्ड मिळवत अत्यंत यशस्वी अभिनेता म्हणून आपला जम बसवला आहे. मध्यंतरी तो ताजमहल हॉटेलमध्ये एका मारामारी प्रकरणातही ट्रोल झाला होता. त्यात त्याने एका व्यक्तीच्या नाकाचं हाड मोडलं होतं. मूळ मुद्दा असा की, जर माजी मंत्र्याची हत्या होऊ शकते, सुपरस्टार सलमान खानच्या घरावर हल्ला होऊ शकतो, सैफच्या घरात घुसून त्याला गंभीर जखमी करू शकतो, तर सामान्य माणसाचं काय होईल हा प्रश्नच आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी दहा-वीस हजार रुपयांच्या बदल्यात पोरं हत्या करण्यास तयार असल्याचं विधान करून मुंबईच्या क्राइम वर्ल्डमधील वास्तविकता सांगितली आहे. गरिबी आणि बेरोजगारी यामुळे तसंच लवकर पैसा कमावण्याच्या हव्यासापायी अशी कृत्यं करण्यास लोक तयार होतात. गुन्हेगारांना कायद्याचा धाक असला पाहिजे. भारतात न्यायव्यवस्था इतकी हळुवार आहे की खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा निकाल लागायला दहा-वीस वर्षे सहज लागतात. यामुळेसुद्धा अनेक वेळा कायदा हातात घेऊन बदला घेण्याची प्रवृत्ती वाढते.
न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय या तीन न्यायालयांच्या प्रवासावरसुद्धा विशिष्ट कालमर्यादा असावी. कालमर्यादा नसल्यामुळे अनेक खटले वर्षानुवर्षे पडून राहतात. ‘तारीख पे तारीख’ या बहुचर्चित संवादाप्रमाणे हे खटले तारखांच्या घोळात गुंतून पडतात. न्याय विलंब म्हणजेच न्याय नाकारणे! आणि न्यायालयात न्याय मिळत नाही किंवा त्याला वेळ लागतो म्हणूनच अनेक लोकांचा न्यायालयाबाहेर निकाल काढण्यामागे कल असतो.
देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस पेंडिंग राहायला कारण अर्थात देशाची अफाट लोकसंख्या. सध्या भारतात अंदाजे 25 हजार न्यायाधीशांची पदे आहेत आणि संपूर्ण देशात जवळपास 4 कोटी 70 लाख केसेस प्रलंबित आहेत. बारा वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती व्ही व्ही राव यांनी देशातील सर्व खटल्यांचा निकाल लागायला 320 वर्षे लागतील असं विधान केलं होतं. न्यायव्यवस्था अधिक बळकट करणं आवश्यक आहे. लोकांना कायद्याचा धाक राहिला तरच अशा घटनांना चाप बसेल.