इनशिऑन: भारताच्या 33 वर्षीय खेळाडू पारूपल्ली कश्यपने कोरियन खुली बॅडमिंटन स्पर्धेतील पुरूषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने मलेशियाच्या डॅरेन लिऊ याच्यावर 21-17, 11-21, 21-12 असा निसटता विजय मिळविला.
गतवर्षी कश्यपने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविले होते. येथे त्याला उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी डेन्मार्कच्या जॉन ओ जुर्गेनसन याच्याशी गाठ पडणार आहे. जुर्गेनसन याने उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका याच्यावर 17-21, 21-16, 21-13 असा रोमहर्षक विजय मिळविला. जुर्गेनसनने 2015 मध्ये जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकाविले होते.
डॅरेनविरूद्धच्या पहिल्या गेममध्ये कश्यप 2-4 असा पिछाडीवर होता. मात्र, त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ करीत 15-10 अशी आघाडी मिळविली. डॅरेनने सलग चार गुण घेत ही आघाडी कमी केली. कश्यपने तीन गुण घेत आघाडी वाढवित शेवटपर्यंत राखली. दुसऱ्या गेममध्ये डॅरेनने आक्रमक खेळ करीत 13 गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी कमी करण्याचा कश्यपने प्रयत्न केला. मात्र, डॅरेनने खेळावरील नियंत्रण ठेवीत ही गेम घेतली आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. साहजिकच तिसऱ्या गेमबाबत उत्सुकता वाढली. 1-2 अशी पिछाडी असताना कोणतेही दडपण न घेता कश्यपने ड्रॉपशॉटस व प्लेसिंग असा खेळ करीत सलग 11 गुण मिळविले आणि आपली बाजू बळकट केली. ही आघाडी तोडून काढण्यात डॅरेनला अपयश आले. भारताच्या पी.व्ही.सिंधू, साईना नेहवाल, बी.साईप्रणित यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.
जुर्गेनसनवर विजय मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करीन-कश्यप
जुर्गेनसन हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध विजय मिळविणे सोपे नाही. तरीही मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. डॅरेनविरूद्धच्य सामन्यातील दुसऱ्या गेममध्ये मी अपेक्षेइतके खेळावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मात्र, पुन्हा तिसऱ्या गेममध्ये मला सूर सापडला आणि मी डॅरेनला फारशी संधीच दिली नाही असे कश्यपने सांगितले.