श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी प्रादेशिक सेनेच्या एका जवानाची हत्या करण्यात आली. त्या कृत्यामागे दहशतवादी असल्याचा संशय आहे. प्रादेशिक सेनेचे जवान मंझूर अहमद बेग ईदनिमित्त रजा घेऊन अनंतनाग जिल्ह्यातील त्यांच्या घरी आले होते. त्यांच्या घरी काही अज्ञात बंदुकधारी आले. त्यांनी केलेल्या गोळीबारात बेग गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. बेग शेजारच्या शोपियॉं जिल्ह्यात रूजू होते. काश्मीरमध्ये याआधीही दहशतवाद्यांनी काही जवानांची अशाप्रकारे हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दहशत निर्माण करण्यासाठी किंवा काश्मिरी तरूणांनी सुरक्षा दलांमध्ये दाखल होऊ नये यासाठी दहशतवादी तशी कृत्ये करत असल्याचे मानले जाते.