हुबळी : देशद्रोहाच्या आरोपावरून अटक केलेल्या तीन विद्यार्थ्यांना हुबळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी उजव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान, या विद्यार्थ्यांना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती हुबळी-धारवाडचे पोलिस अधीक्षक आर. दिलीप यांनी दिली.
हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना न्यायालयात नेत असताना त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. त्यांच्या कडून बॉन्ड लिहून घेतल्यानंतर त्यांना रविवारी सोडण्यात आले होते. त्यांना पुन्हा अटक का केली याबाबत पोलिस काहीही बोलण्यास तयार नाहीत. या मुलांना सोडल्यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले होते.
हुबळीतील केएलई इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये हे विद्यार्थी शिकत आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.
या खटल्यात या विद्यार्थ्यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय हुबळी बार असोसिएशनने घेतला आहे. आपला पोलिसांनी कोणताही शारीरिक छळ केला नसल्याचे या विद्यार्थ्यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान त्यांची सशर्त सुटका केल्याने गोकूळ रोड पोलिस ठाण्याच्या बाहेर उजव्या संघटनांनी रविवारी रात्री निदर्शने केली होती.
या विद्यार्थ्यांविरूध्द न्यायलयापुढे हजर करण्याजोगा पुरेसा पुरावा नसल्याने फौजदारी दंड संहितेच्या कलम 169 चा आधार घ्यावा लागला. केलईमध्ये तीन काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्याचा व्हिडिओ बनवला. तो सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचे आम्हाला समजले. त्यावेळी गोकूळ रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक तेथे गेले. त्यांनी त्याला अटक केली, असे पोलिस अधिक्षक आर दिलीप यांनी सांगितले.
हे विद्याथीर शोपीया मधील रहिवासी आहेत. कॉलेज प्रशासनाने तक्रार नोंदवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. देशद्रोह आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आले आहेत. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संगीत लावून हे विद्यार्थी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देत होते, असे प्राचार्यांनी सांगितले.
होस्टेलच्या आवारातून पोलिस त्यांना नेत असताना त्यांच्यावर काही जणांनी शिविगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला, असे स्थानिक माध्यमांत म्हटले आहे. तर या व्हिडिओतील संगीत हे पाकिस्तानच्या लष्कराच्या माध्यम विभागाचे असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
आम्ही त्या पार्श्वसंगिताकडे लक्ष देत आहोत. त्यांना कोणी चुकीचे मार्गदर्शन करत आहे का? हेही आम्ही तपासत आहोत. या प्रकरणात कोणत्याही समाज अथवा प्रदेशाच्या दृष्टीकोनातून आम्ही पहात नाहीत आहोत, असे दिलीप यांनी सांगितले.