आसीया अंद्रबी आणि साथिदारांवर देशद्रोहाचा गुन्हा

नवी दिल्ली – विलगतावादी काश्‍मिरी कार्यकर्त्या आसिया अंद्रबी आणि तिच्या दोन साथिदारांवर देशाविरूध्द युध्द पुकारल्याच्या आरोपावरून देशद्रोह आणि देशात दहशतवादी कृत्य घडवल्याचा कट रचल्याचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.

देशाविरूध्द युध्द घडवण्यासाठी पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी संघटनांचा पाठींबा मिळवल्याचा आरोपाशी संबंधित हे प्रकरण आहे. अंद्रबी आणि तिच्या सहकारी नहिदा नसरीन यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि कडक अशा बेकायदा कृत्य प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश विशेष न्यायधिश प्रविणसिंग यांनी दिला. त्यांना एप्रिल 2018मध्ये अटक करण्यात आली.

न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरोधात युध्द छेडणे, भारत सरकार विरोधात युध्द छेडणे, देशद्रोह, दोन गटांत वैमनस्य निर्माण करणे आणि जनतेला प्रक्षुब्ध करणारी वक्तव्ये करणे असे गुन्हे नोंदवले आहेत.

या शिवाय बेकायदा कृत्य प्रतिबंधात्मक कायद्याखाली दहशतवादाचे समर्थन किंवा त्याची वकीली, दहशतवादी संघटनांचे सदस्यत्व स्वीकारणे, दहशतवादी संघटनांमध्ये भरती संदर्भातील गुन्हे, दहशतवादी संघटनांना पाठींबा देण्याच्या संदर्भातील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे गुन्हे अधिकृतरित्या 18 जानेवारीला नोंदवण्यात येतील. दुख्तरन इ मिलत या बंदी घातलेल्या संघटनेच्या अंद्रबी या प्रमुख आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.