मतदान नाकारल्यामुळे कश्‍मिरी पंडितांचे आंदोलन

जम्मू – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी येथील श्रीनगर मतदार क्षेत्रातील विशेष केंद्रांमध्ये कश्‍मिरी पंडीत मतदानासाठी गेले खरे; पण मतदार यादीत त्यांचे नावच नसल्यामुळे ते मतदान करू शकले नाहीत. यामुळे संतापलेल्या कश्‍मिरी पंडितांनी प्रशासन आणि निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार आंदोलन केले.

मतदान करू न शकलेल्या राधाकृष्ण भट यांनी सांगितले की, आम्ही मतदानासाठी केंद्रांवर गेलो, पण यादीमधून आमचे नावच गायब होते. यामुळे आम्हाला मतदानाचा हक्‍क बजावता आला नाही. माझ्या कुटुंबीयांपैकी चार जण मत टाकू शकले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असाच प्रकार मिंटू मावा यांच्या कुटुंबीयांबाबतही घडला. तेही स्थलांतरित कश्‍मिरी पंडित असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून फॉर्म-एम भरून घेतला होता. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नाव मतदार यादीत असायला हवे होते. आमचा मतदानाचा हक्क का डावलला गेला, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आणखी एक स्थलांतरित कश्‍मिरी पंडित स्वरूप चांद हेदेखील मतदानासाठी आपल्या पाच जणांच्या कुटुंबीयांसहीत गेले होते, पण त्यांचेही नाव मतदार यादीत नव्हते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.