नवी दिल्ली : चंदिगडची मध्यमगती गोलंदाज काशवी गौतमने एकाच डावात सर्वच्या सर्व १० गडी बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कडपा येथे (आंध्र प्रदेश) सुरू असलेल्या महिलांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अरूणाचलविरूध्द काशवीने ही कामगिरी केली.
काशवीने ४.५ षटकांत १२ धावा देत अरूणाचलच्या १० फलंदाजांना तबूंचा रस्ता दाखविला. यामुळे अरूणाचलचा संघ २५ धावांत गुंडाळला. चंदिगडने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा केल्या होत्या. हा सामना चंदिगडने १६१ धावांनी जिंकला. काशवीने ६८ चेंडूत ४९ धावांची खेळी करत फलंदाजीतही चमक दाखवली होती.
दरम्यान, २००८ साली मणिपूरकडून अरूणाचलविरूध्दच खेळताना वेगवान गोलंदाज राॅकी सिंगने एका डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी १९५६ मध्ये इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जिम लेकरने केली होती, तर भारताचा लेग स्पिन गोलंदाज अनिल कुंबळेने १९९९ साली पाकिस्तानविरूध्द अशी कामगिरी केली होती.