भाजप, कॉंग्रेसचा प्रचार रंगणार ः दोन्ही पक्षांच्या पदयात्रा, बैठका
पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार आजपासून सुरू होणार आहे. या निवडणूकीत भाजप विरोधात महाविकास आघाडी असा सरळ सामना होणार असल्याने गुरुवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.
महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी साडेनऊ वाजता ओंकरेश्वर मंदिर येथून केला जाणार असून, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढली जाणार आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) रिपाइं, शिवसंग्राम तसेच रासपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तर, महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभही सकाळी साडेनऊ वाजता तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून सुरू केला जाणार आहे. कसबा विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत धंगेकर हे पदयात्रा काढणार आहेत. महाविकास आघाडीतील कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
8 अर्ज बाद, 21 उमेदवारांचे अर्ज वैध
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आलेल्या 29 उमेदवारांच्या अर्जांची छाननी बुधवारी झाली. यामध्ये 8 उमेदवारांचे अर्ज बाद, 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (दि.10) आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि.31 जानेवारीपासून मंगळवारपर्यंत (दि.7) मुदत होती. या निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 39 अर्ज सादर केले होते. बुधवारी झालेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीमध्ये काही उमेदवारांनी उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केलेली नव्हती. पक्षाचा एबी फॉर्म न जोडणे, सूचकांची स्वाक्षरी नसणे आदी कारणांमुळे 8 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोण अर्ज माघारी घेते. तसेच बंडखोरांना थांबविण्याचे आव्हान काही राजकीय पक्षांकडे आहे.
वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना करता येणार टपाली मतदान
पुणे – यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाने 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कसबा विधानसभा मतदारांघात 80 वर्षांवरील 19 हजार मतदार असून आतापर्यंत 49 जणांनी टपाली मतदान करण्यासाठी अर्ज भरून दिला आहे. वय 80 वर्षेपेक्षा जास्त, तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जागृती करत आहेत. मतदार नोंदणी करणारे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून नमुना 12-डी अर्ज भरुन घेत आहेत.