पुणे :- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मला विधानसभेत जाण्याची संधी दिली. मात्र, मला अवघा १६ महिन्यांचा कालावधी मिळाला. अल्पावधीतच पुणेकर आणि विशेषतः कसबा मतदारसंघातील नागरिकांशी संबंधित ३१६ प्रश्न आणि असंख्य लक्षवेधी सूचना उपस्थित करून पुणेकरांचा आवाज बुलंद करण्याचे काम मी केले. त्यातून अनेक प्रश्न प्रत्यक्ष मार्गी लागले, याचे समाधान आहे, असे प्रतिपादन आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
धंगेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १९ लोहियानगरमधील सर्व गल्ल्यांमध्ये, तसेच एकबोटे कॉलनीमध्ये प्रचार यात्रा काढण्यात आली. या प्रचार यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अविनाश बागवे, यासेर बागवे, युसूफ शेख, संजय गायकवाड, जुबेर दिल्लीवाला, हेमंत राजभोज, गणेश नलावडे, रवी पाटोळे, आयुब पठाण, विजया मोहिते, मनोज यादव आदी या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते.
धंगेकर म्हणाले, की महापालिकेकडून घरमालकांना देण्यात येणारी ४० टक्के कर सवलत रद्द केल्यामुळे त्याबाबतची लक्षवेधी मी आग्रहाने उपस्थित करून पुणेकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. पुण्यातील मध्यमवर्गीय व गरिबांची ५०० चौरस फुटांची घरे मिळकतकर माफी, रिक्षाचालक व मालकांसाठी स्वतंत्र महामंडळ, शहराला वाढीव पाणी मिळावे, यासाठी लक्षवेधी उपस्थित केली.
Maharashtra Assembly Election 2024 : ‘मतदारांचा माझ्या कामावर विश्वास’ – रवींद्र धंगेकर
शहरातील ड्रग्स तस्करी, अवैध पब आणि हुक्का बार यासंदर्भात आक्रमक भूमिका मांडून पोलीस यंत्रणेला त्याच्याविरोधात कडक कारवाई करायला भाग पाडले. आपल्या कालावधीतील चारही अधिवेशनात माझी सरासरी उपस्थिती सुमारे ९० टक्के इतकी होती. पुढील पाच वर्षांत इतक्याच आक्रमकपणे काम करून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणण्याचे काम आपण करणार असल्याचे आश्वासनही या वेळी धंगेकर यांनी मतदारांना दिले.