पुणे – कसबा पेठ मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काॅंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व धर्मिय कार्यकर्त्यांनी धंगेकर यांच्या समर्थनार्थ गर्दी केली होती.
उमेदवारी निश्चित झाल्यावर धंगेकरांनी प्रथम केसरीवाड्यात शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक कुटुंबियांची भेट घेतली. “कसबा मतदार संघात काम करताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याशी 20 वर्षांपासूनचा माझा संपर्क होता. अनेक सामाजिक कामाबाबत त्यांच्याशी चर्चा होत असे. त्यामुळे आज टिळक कुटुंबियांची भेट घेतली आहे.”, असे धंगेकर यांनी सांगितले.
भाजपने टिळक परिवारात उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे टिळक परिवारासह ब्राम्हण समाज नाराज आहे. या पार्श्वभूमिवर धंगेकरांनी टिळक परिवाराची भेट घेतली आहे. निवडणुकीत या भेटीचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपच्या हिंदुत्ववादी प्रतिमेच्या विरोधात धंगेकर यांचा सर्वधर्मिय कार्यकर्त्यांमध्ये संपर्क आहे. कसबा मतदार संघात धंगेकर यांच्या या प्रतिमेचा काॅंग्रेसला फायदा होणार आहे. कार्यकर्ता ही धंगेकर यांची प्रतिमा या निवडणुकीत जमेची बाजू ठरणार आहे.
काॅंग्रेसचे शहरातील सर्व नेते गटतट विसरुन उनेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार संग्राम थोपटे हे माजी मुख्यमंत्री नेते देखील यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र धंगेकर यांची ओळख होती. मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक पदावर कामे केली आहेत. जानेवारी 2017 मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे. कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे.
विधानसभा निवडणूकांमध्ये धंगेकर यांनी बापटांसमोर क़डवे आव्हान उभे केले होते. त्यांनी 2009 साली विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांचा अवघ्या 7 हजार मतांनी पराभव झाला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यात लाट असताना देखील धंगेकर यांनी आव्हान दिले होते.
दरम्यान, कसवा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले होते. पण त्याला विरोधी पक्षांना प्रतिसाद दिला नाही. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्याआधी ही निवडणुक होत असल्याने सर्व पक्षांची ताकद येथे पणाला लागल्याचे दिसत आहे.