सातारा – कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवणे व सांडवा मजबुतीकरणाचा प्रकल्प नव्या प्रशासकीय मान्यतेसाठी रखडून पडला आहे. कास धरणाच्या अद्ययावतीकरणाची किंमत आता तब्बल 113 कोटींवर पोहचली असून अद्यापही प्रकल्पाचे तीस टक्के काम बाकी आहे.
जलसंधारण विभागाला शासनाकडून 17 कोटीच्या निधीचा हिरवा कंदिल मिळाल्याने कास धरण परिसरात पुन्हा यंत्रांची घरघर सुरू झाली आहे. प्रकल्पाच्या वार्षिक दराची तांत्रिक मान्यता 2009 मध्ये घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष 19 महिन्यानंतर कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती.
आता दहा वर्षानंतर धरणाच्या आराखड्यात काही बाबींचा नव्याने समावेश झाल्याने धरणाची किंमत दुप्पटीपेक्षा अधिक वाढली आहे. कास धरणाची दहा वर्षापूर्वी मूळ किंमत 42 कोटी रूपये अपेक्षित धरण्यात आली होती. मात्र, त्याच धरणाची किंमत नोव्हेबर 2019 च्या आढाव्यात 84.66 कोटीवर पोहोचली. आता त्यामध्ये कास धरण आणि गावठाणाच्या परिसरात सुलभ दळणवळणासाठी काही रिंगरोडचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तीस कोटीचे स्वतंत्र नियोजन आहे. त्यामुळेच धरणाची किंमत 113 कोटींवर पोहोचली आहे.
यामध्ये रिंग रोड, स्वतंत्र कंट्रोल युनिट, आवश्यक ठिकाणी सिमेंटचे ग्राउंटिंग व 900 मीटरची स्वतंत्र पाईपलाईन व काही ठिकाणी वॉचिंग टॉवर आदी कामे करण्यात येणार आहेत. जलसंपदा विभागाने याचा आराखडा सातारा पालिकेला पाठवला असून 113 कोटींच्या वार्षिक दराच्या प्रशासकीय मंजुरीचा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर येणार आहे. केवळ या विषयाची टिपणी मंजूर नसल्याने सर्वसाधारण सभेला मुहुर्त मिळेनासा झाला आहे.
पहिल्या टप्प्यात सांडवा मजबुतीकरण व दुसऱ्या टप्प्यात तत्सम कामे असा तीस टक्के प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे. धरणाची किंमत वाढल्याने 80:20 च्या फॉर्म्युल्यामध्ये पालिकेची लोकवर्गणी 22 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे हा निधी गोळा करताना पालिकेची मोठी कसरत होणार आहे. वित्त व लेखा विभागाला 22 कोटीच्या संकलनाचे मोठे उद्दिष्ट आहे.
मजबुतीकरण यावर्षी पूर्ण होणार
पालिकेचे पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर व नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे यांनी बुधवारी कासचा दौरा केला. कासच्या अतिरिक्त पाणीसाठ्याची पाइपलाइन व धरणाच्या सांडवा मजबुतीकरणाचा प्रकल्प चालू वर्षात पूर्ण करण्याचा मानस नारकर यांनी व्यक्त केला. शहापूरच्या पंप हाऊसचे अद्ययावतीकरण (कंट्रोल पॅनेल ट्रान्सफर), पॉवर हाऊस ते माची पेठ खापरी लाईनचे काम चालू वर्षी पूर्ण करणे, माची पेठ ते घोरपडे टाकी पंपिंग लाइन व नागझरी टाक्यांच्या वितरण नलिका टाकण्याचे काम पूर्ण करणे, घोरपडे टाकीचा पंप बदलणे आदी कामांमुळे सातारकरांना मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचे नारकर यांनी सांगितले .