बंगळूर : करुण नायरने ४८ चेंडूत १२४ धावांची तुफानी खेळी करताना महाराजा करंडक स्पर्धेत म्हैसूर संघाला विजय मिळवून दिला. मंगळूर ड्रॅगन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात करुणने २५८.३३ च्या स्ट्राईकने फटकेबाजी केली.या खेळीत त्याने तब्बल १३ चौकार व ९ षटकार मारताना केवळ २२ चेंडूत १०६ धावांची वसुली केली. करुणच्या दमदार खेळीने म्हैसूर संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद २२६ एवढी धावसंख्या उभारली. पावसाने प्रभावित झालेल्या या लढतीत मंगळूर ड्रॅगन्स संघाने १४ षटकांत १३८ धावा केल्या होत्या. डीएलएस पद्धतीने ही लढत म्हैसूर संघाने २७ धावांनी जिंकली.
सुमारे ८ वर्षांपूर्वी करुण नायरने चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडसमोर ३०० धावांची खेळी होती. त्यानंतर पुन्हा त्याला खूपशी संधी मिळाली नाही. संघाबाहेर राहिल्याने करुणच्या कामगिरीत देखील घसरण झाली. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील जास्त धावा करता आल्या नाहीत. करुण नायरने भारताकडून शेवटचा सामना २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. गेल्या ७ वर्षांपासून वरिष्ठ संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेल्या करुण नायरच्या वादळी खेळीने निवड समितीला त्याची दाखल घेण्यास भाग पाडले आहे.
माझी ही आतापर्यंतची सर्वोत्तम फलंदाजी करत आहे. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते, त्याचा मी फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. आजही मी रोज सकाळी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतो. आमचा कर्नाटकचा संघ मागील वेळी रणजी करंडक जिंकू शकला नाही, मात्र या वर्षी तो जिंकण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रिया करुण नायरने लढतीनंतर दिली.