आळंदी, – कार्तिकी वारी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आनंददायी वातावरणात हरिनाम गजरात कार्तिक वद्य अष्टमी (दि. 23 नोव्हेंबर) ते कार्तिक वद्य अमावस्या (दि. 1डिसेंबर) दरम्यान पार पडला. या कालावधीत पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांनी आळंदीला भेट देऊन माऊलींचे दर्शन घेतले.
यंदाच्या वारी सोहळ्यात द्वादशीचा श्रींचा रथोत्सव मुख्य आकर्षण ठरला. दीडशे वर्षांनंतर पहिल्यांदाच पुरातन भव्य रथातून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा उत्सव अनुभवला. सोहळ्यादरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. चांगला व्यवसाय झाल्यामुळे छोटे-मोठे विक्रेते, व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. तर प्रशासकीय अधिकार्यांनी एकमेकांमध्ये सुसंवाद ठेवून नियोजनबद्ध केलेल्या कामगिरीमुळे भाविक, वारकर्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या. वारी सोहळा उत्तम प्रकारे पार पाडण्यात आळंदीकर ग्रामस्थांचेही विशेष योगदान आहे.
मंदिर समिती, पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ, नगरपरिषद यांच्यातील सुसंवादामुळे भाविकांना चांगल्याप्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देता आल्या. 100 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वच्छता वॉरियर्स म्हणून केलेल्या नियुक्तीमुळे शहरतील प्रमुख रस्ते, इंद्रायणी घाट प्लॅस्टिक बॉटल व कचरामुक्त ठेवण्यात यश मिळाले.
– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
दरवर्षी एकादशीनंतर द्वादशीला बराच समाज माघारी जातो मात्र यंदा त्रयोदशीला माऊलींच्या समाधी सोहळ्याला मोठा समाज होता. दर्शनबारीही पूर्ण भरलेली होती. संस्थानातर्फे दर्शनबारीत 24 तास अन्न प्रसाद, पाणी वाटप सुरू होते. रस्त्यावरील हॉकर्स काढल्यामुळे भाविकांना कमी त्रास झाला. नगरपरिषद, महावितरण, पोलीस, महसूल यांच्या सहकार्याने वारी ज्ञानोबारायंनी सुखरूप पार करून नेली.
– योगी निरंजननाथ, विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी
वारी सोहळ्यादरम्यान 500 कर्मचारी, 600 होमगार्ड, 80 अधिकारी, आरसीपी 4 प्लाटुन, एसआरपी 5 प्लाटुन असा मोठा बंदोबस्त भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. नगरपरिषद, देवस्थान, ग्रामस्थ, वारकरी सर्वांचे सहकार्य लाभले. चांगल्या प्रकारे सोहळा पार पडला.
– भीमा नरके, वरिष्ठ निरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे
दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगला व्यवसाय झाला. आमच्याकडे पखवाज, टाळ, वीणा, हार्मोनियम, तबला डग्गा असे वारकरी सांप्रदायिक साहित्य विक्रीसाठी आहे. यामध्ये पखवाज, टाळ, वीणा या सांहित्यांची जास्त विक्री झाली.
– बाळासाहेब गुरव, सर्वेसर्वा, स्वरांजली हार्मोनियम
यंदा प्रतिवर्षीप्रमाणे कापड व्यवसायिकाचा धंदा अपेक्षित होता; परंतु थंडीचे प्रमाण देखील कमी होते व नियमानुसार कार्तिकी यात्रेत पाऊस देखील झाला नाही यामुळे रेनकोट खपले नाहीत.
– नंदमुमार वडगावकर , कापड व्यावसायिक
यंदा यात्रा अपेक्षा पेक्षा जास्त भरेल, अशी आशा सर्व व्यापाऱ्यांना होती, परंतु निवडणुकीचा कालावधी असल्याने धावती यात्रा झाली. दशमी एकादस बारस या तीन दिवशी यात्रा फुल होती; परंतु सलग आठ दिवसाची असते त्यानुसार हॉटेल व्यवसाय यांना चांगला धंदा होईल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही.
– रमेश दिघे, हॉटेल व्यवसायिक :