नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांची आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी पुन्हा चौकशी केली. कार्ती हे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांचे पुत्र आहेत.
नवी माहिती ईडीच्या हाती आल्याने कार्ती यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. त्या प्रकरणात चिदंबरम पिता-पुत्रांना याआधी सीबीआयने अटक केली होती. चिदंबरम अर्थमंत्रिपदी असताना आयएनएक्स मीडिया ग्रुपवर मेहेरनजर करण्यात आल्याचा आरोप आहे.
त्या ग्रुपवर मेहेरनजर केल्याने चिदंबरम पिता-पुत्रांना आर्थिक लाभ मिळाल्याचा दावाही ईडीने केला आहे. त्याप्रकरणी 2018 मध्ये कार्ती यांच्या 54 कोटी रूपयांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या. त्या मालमत्ता भारताबरोबरच ब्रिटन आणि स्पेनमधील आहेत.