करतारपूरसाठी 23 ऑक्‍टोबरला करार करणार

यात्रेकरूंच्या हिताचा विचार केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिपादन
20 डॉलरच्या सेवा शुल्क रद्द करण्याबाबत पाकिस्तानला पुन्हा विनंती

नवी दिल्ली : करतारपूर कॉरिडोरच्या प्रत्यक्ष वापराठी 23 ऑक्‍टोबरला पाकिस्तानशी करार करण्यास भारताने सोमवारी तयारी दर्शवली. पाकिस्तानकडून प्रति यात्रेकरू 20 डॉलर सेवा शुल्क आकारण्याबद्दल भारताने निराशा व्यक्त केली असून त्या निर्णयावर पाकिस्तानला पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील यात्रेकरू आणि “ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया’ कार्डधारक असलेले विदेशी यात्रेकरूंना पाकिस्तानमधील करतारपूर साहिबला भेट देणे शक्‍य व्हावे यासाठी करतारपूर साहिब कॉरिडोरसाठी आवश्‍यक अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास भारत सरकारने पुढाकार घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

भारतातील यात्रेकरूंच्या भेटीसाठी अनेक घटकांबाबत सुविधा पुरविण्याबाबत समजूत झाली आहे, परंतु पाकिस्तान प्रत्येक यात्रेकरूसाठी 20 डॉलरचे सेवा शुल्क आकारण्याचा आग्रह धरत आहे, ही निराशेची बाब आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. यात्रेकरूंच्या इच्छेनुसार पाकिस्तान सरकारने असे शुल्क आकारू नये, असे भारत सरकारने पाकिस्तानला सातत्याने सांगितले आहे.

गुरुद्वारा करतारपूर साहिबला व्हिसामुक्त प्रवेश मिळावा, तसेच 12 नोव्हेंबर रोजी गुरु नानक यांच्या जयंतीपूर्वी कॉरिडॉर कार्यान्वित व्हावा ही यात्रेकरूंची प्रदीर्घ प्रलंबित मागणी लक्षात घेता भारत सरकारने कॉरीडॉरवरील करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.