पुणे – अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते पु.ल. देशपांडे यांना आदरांजली वाहणाऱ्या आणि स्मृती जागवणाऱ्या पु.ल.स्मृती महोत्सवाचे आयोजन करोनामुळे ऑनलाइन करण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत यंदा “करोनावरची वरात’ या लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. यास्पर्धेतील निवडक लेखांचे अभिवाचन दृश्य स्वरूपात पाहता येणार आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकच्या वतीने देण्यात आली.
दरवर्षी पुलोत्सव आणि पु.ल.स्मृती महोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा करोनामुळे 12 जून रोजी नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार नसल्याने, “करोनावरची वरात’ हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता “पुलोत्सव’ या फेसबुक पेजवर रसिकांना पाहता येणार आहे. “आज जर पु.ल. असते तर त्यांनी या करोना संकटाकडे कसे पाहिले असते?’ या विषयावर “करोनावरची वरात’ या लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रासह बंगळुरू, हैदराबाद आदी शहरांसह अमेरिका, ब्रिटन, दुबई आदी देशांतून पुलप्रेमींनी या स्पर्धेस प्रतिसाद दिला आहे.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 11 लेखांची निवड करण्यात असून, विजेत्या लेखांचे अभिवाचन दृश्य स्वरुपात करण्यात येणार आहे. आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, डॉ. गिरीश ओक, पुष्कर श्रोत्री, चिन्मय मांडलेकर, अमेय वाघ, सारंग साठ्ये, प्रवीण तरडे, डॉ. मोहन आगाशे करणार आहेत. तर सचिन तेंडूलकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. नरेंद्र जाधव, अशोक सराफ, रामदास फुटाणे आणि आनंद भाटे यांच्या चित्रफिती पाहता येणार आहेत.