काळजी घ्या रे बाबांनो ! पुण्यात करोनाची दहशत कायम

शहरात नव्याने 414 बाधित वाढले ;जिल्ह्यातील 12 गावे करोना हॉटस्पॉट


पुणे –
शहरात करोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे ऍक्‍टिव्ह केसेस 2,561 वर पोहचल्या आहेत. शनिवारी नव्याने 414 करोना बाधित सापडले असून, 5 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या वाढत्या आकड्यांमुळे पुणेकर मात्र पुन्हा दहशतीखाली वावरत आहेत.

बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकेने स्वॅब टेस्टिंग संख्या वाढवली आहे. शनिवारी दिवसभरात 4,634 संशंयितांची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी ही संख्या 4200 होती. शनिवारच्या आकडेवारीनंतर शहरातील एकूण बाधित संख्या 1 लाख 97 हजार 330 वर पोहचली. सक्रीय बाधितांतील 160 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, ऑक्‍सिजनवरील रुग्णांची संख्या वाढून ती 345 झाली आहे. गेल्या 24 तासांत शहर हद्दीतील 5, तर हद्दीबाहेरील 1 जणाचा करोनाने मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 4 हजार 821 वर पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात 247 जण करोनामुक्‍त झाले आहेत. त्यामुळे करोनामुक्‍तांची एकूण संख्या
1 लाख 89 हजार 948 झाली आहे.

शिरूर तालुक्‍यात संसर्गवाढ
शहरासह आता ग्रामीण भागातही करोनाचे बाधित वाढत आहेत. त्यात 12 गावे करोनाची हॉटस्पॉट ठरली असून, दिवसेंदिवस अशा गावांच्या संख्येत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी हवेली तालुक्‍यात करोनाचा प्रसार कमी झाला होता. मात्र, आता येथे पुन्हा करोना रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुळशी आणि जून्नर तालुक्‍यातील काही गावे मायक्रो हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. शिरूर तालुक्‍यात सध्या सर्वांत जास्त करोना हॉटस्पॉट गावे ठरली आहेत.

जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. कार्यक्रमांमध्ये गर्दी करू नये. याशिवाय सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे.
– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.