लोणी काळभोर – हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीत काम करणारे व पूर्व हवेलीतील रहिवासी असणाऱ्या चार कर्मचाऱ्यासह, एका कर्मचाऱ्याची पत्नी असे पाच जण मंगळवारी (दि. 26) रात्री उशिरा करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
या कामगारांपैकी एक कामगार कदमवाकवस्ती हद्दीतील कवडी माळवाडी परिसरातील, तर तीन कामगार व एका कामगाराची पत्नी असे चार जण मांजरी बुद्रुक हद्दीतील रहिवासी आहेत. मागील गुरुवारपासून सलग पाच दिवस पूर्व हवेलीमधील विविध गावांत करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.
हडपसर परिसरातील याच नामांकित काम करणारे व पूर्व हवेलीत राहणारे तब्बल सात कामगार व एका कामगाराचा मुलगा व अन्य कामगाराची पत्नी असे नऊ जण करोनाच्या विळख्यात आले आहेत. या कंपनीमधील काही कामगारांना करोनाची लक्षणे आढळून आल्याने कंपनी व्यवस्थापनाने गुरुवार (दि. 21) पासून कामगारांच्या करोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
यात रविवारी (दि. 24) आळंदी म्हातोबाची येथील एक तर मांजरी बुद्रुक हद्दीतील एक असे दोन कामगार करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. तर मागील दोन दिवसांत कदमवाकवस्ती व मांजरी बुद्रुक हद्दीतील चार कामगार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण एकाचवेळी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, वरील चारही कामगारांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व घरातील सदस्य अशा सर्वांची करोना टेस्ट करण्यासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
कदमवाकवस्ती हद्दीत स्थानिक भाजीपाला विक्री करणाऱ्यांसह हडपसर भागातून आलेले अनेक भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करत आहेत. भाजीपाला विक्रेते व खरेदी करणारे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नसल्याने, भाजीपाला विक्री त्रासदायक ठरणार हे नक्की.