शिक्रापूर – येथे बॅंकेचा कर्मचारी करोनाबाधित असल्याचे समोर आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. तर शिक्रापूरमध्ये तीन दिवसांत पाच करोना रुग्ण आढळून आल्याने परिसर हादरून गेला असून नागरिक भयभीत झाले आहे. आज आढळलेला रुग्ण शिक्रापूर येथील राऊतवाडी येथे राहणारा असून हडपसर येथे एका बॅंकेमध्ये नोकरीला आहे. या बॅंकेतील काही कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्यात आलेली असताना 11 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचारी यांसह आदींनी रुग्णाच्या घराजवळील सर्व परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या आई, वडील, भाऊ व त्याच्या सोबत हडपसर येथे कामाला जाणाऱ्या त्याच्या एका मित्राचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहे, तसेच त्या कामगाराच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहित संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे.
कंपनी कामगाराचा मुलगा पॉझिटिव्ह
रांजणगाव गणपती येथील कंपनीत कामाला जाणारा कंपनी कामगार बाधित झाला असल्याचे समोर आले असताना आरोग्य विभागाने त्या कामगाराच्या घरातील चार जणांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. त्यातील कामगाराच्या आठ वर्षाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
मलठण फाटा परिसरात राहणारा चाळीस वर्षीय कामगार रांजणगाव गणपती येथे एका कंपनीमध्ये कामाला आहे. त्याला (दि.21) सर्दी, खोकला, तापाचा त्रास होऊ लागल्याने तो शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेला होता. त्याची तपासणी करून पुढील उपचारासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पुणे येथे त्याची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यांनतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा यांनी कामगाराचे आई, वडील, पत्नी व दोन लहान मुलांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी कामगाराच्या घरातील चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे असून आठ वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिक्रापूर परिसरात पुन्हा बाधित आढळल्यामुळे नागरिक हादरून गेले आहेत.