तळेगाव ढमढेरे/शिक्रापूर (वार्ताहर) –येथून जवळच असणाऱ्या शिवतक्रार म्हाळुंगी येथील एका युवकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या दहावर पोहोचली आहे.
शिवतक्रार म्हाळुंगी येथील एका 24 वर्षीय युवकाला काही कारणास्तव उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दहा मे रोजी दाखल केले होते. त्याच्यावर येथे चार दिवस उपचार करण्यात आले. फरक न पडल्याने त्याला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असताना तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी या रुग्णाची करोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे. यानंतर शिक्रापूरसह संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला आहे. याबाबत माहिती प्राप्त होताच शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, बाजार समितीचे संचालक विकास शिवले, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार वैद्य, तलाठी अमोल थिगळे यांसह आदींनी शिवतक्रार म्हाळुंगी येथे धाव घेत परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी सुरु केली.
या युवकाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. करोना बाधित युवक आढळून आलेल्या ठिकाणाजवळील काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी देखील औषध फवारणी करण्यात आली आहे. येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार असून नागरिकांचा सर्वे करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.