कराडलगतच्या गावात वाढतोय करोना

काळजी घेण्याची गरज ः आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेवर वाढता ताण

कराड -कराड शहरातील बनपूरी कॉलनी, मलकापूर शहरात ठराविक भागात तसेच मुंढे, वारूंजी तसेच सैदापूर गावात करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने येथे मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. मलकापूरमध्ये तर गेल्या पाच-सहा दिवसांत 15 रुग्ण वाढल्यामुळे शहरात तिसऱ्यांदा चार मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत. त्यामुळे कराड शहराच्या चौफेर करोनाचा फैलाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

मलकापुरातील करोनाची साखळी खंडित करण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाच्या सादाला प्रतिसाद देत मलकापूरच्या नागरिकांनी चांगली साथ दिली होती. त्यामुळे शहरातील करोना संसर्ग वाढीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले होते. त्यासाठी पहिल्यांदा शहरातील प्रभाग 5, 3, 8,2 पूर्णव 9 मधील काही भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. त्याचबरोबर पालिका व शासनाच्या जोडीला कृष्णा रुग्णालय प्रशासनाने करोनाची साखळी खंडित, करण्यात मोलाचे योगदान दिले. योग्य उपचाराने त्यावेळी आगाशिवनगर 1, अहिल्यानगर 13 आणि विश्रामनगर व साईनगर प्रत्येकी 1 असे शहरातील 26 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

पहिल्या साखळ्या थांबल्या. मात्र, मुंबईहून आलेले पाचजण पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा हा झोनचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामध्ये प्रभाग 4, 3 व 9 मधील नवीन रुग्ण सापडलेली ठिकाणे कंटेन्मेंटमध्ये घेण्यात आली होती. दि. 26 एप्रिलला शहरातील सर्व रुग्ण बरे झाल्याने मलकापूर शहर करोनामुक्त व कंटेन्मेंटमुक्त झाले होते. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर 26 जूनला खंडोबानगरमधे पुन्हा करोनाचा शिरकाव झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यासह बाहेरून आलेले असे सात दिवसांत 15 जणांचे आहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सध्या शहरात चार ठिकाणे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. रोज नवीनच रुग्ण वाढत असल्यामुळे मलकापूर पुन्हा एकदा करोनाचा हॉटस्पॉट बनत चालले आहे.

याशिवाय शहरालगतच्या सैदापूरसह वारूंजी व मुंढे गावात करोनाचा फैलाव झाला आहे.
वारूंजीत प्रसुतीसाठी आलेली महिला करोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावाला धडकी भरली असून या महिलेच्या निकट सहवासीतांसह 98 जणांना क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी रात्री लगतच्या मुंढे गावातील मुंबईरिटर्न असलेला युवक करोना पॉझिटिव्ह आल्याने मुंढे गावातील संबंधित वॉर्ड मायक्रो कंन्टेमेन्ट झोन जाहीर केला आहे. त्यामुळे कराडच्या चौफेर करोनाचा फैलाव वाढत असल्याने प्रशासनाची डोखेदुखी वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.