शिक्रापूर – शिक्रापूरसह परिसरात मंगळवारी (दि. 11) 24 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शिक्रापुरात 11, तळेगाव ढमढेरेत 7, धानोरेत 2, कोरेगाव भीमात 3 तर सणसवाडीत 1 असे तब्बल 24 करोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. त्यामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिक्रापूरसह आजूबाजूच्या आदी गावांमध्ये विविध ठिकाणी, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये दररोज नियमितपणे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आज करोनाबाधितांच्या संख्येने अचानक डोके वर काढले असून शिक्रापूर येथे तब्बल 11 तर एकाच घरातील 6 व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी रुग्ण राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. सर्व करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे.