मुंबई – ‘बिग बॉस १६’ चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅनची क्रेझ ही संपूर्ण जगभरात आहे. त्याचा शो पाहण्यासाठी लाखो चाहते येतात. मात्र नुकतंच काही संघटनांनी स्टॅनचा इंदौर येथील शो बंद पाडला होता. या शोमध्ये रॅपरला मारहाण करत धमकावल्याचाही आरोप करण्यात आले. स्टॅन रॅप करताना असभ्य भाषेचा वापर करतो असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. स्टॅनच्या याच भाषेवरून आता करणी सेनेने देखील त्याला इशारा दिला आहे.
‘बिग बॉस १६’ जिंकल्यानंतर एमसी स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट घेत आहे. १७ मार्च रोजी इंदौरमध्ये त्याच्या शो दरम्यान राडा झाल्याचे समोर आले होते. यानंतर करणी सेनेचे युवा अध्यक्ष भागवत सिंह बलोत यांनी एमसी स्टॅनला इशारा दिला आहे.बलोत सिंग यांनी एका मनोरंजन मीडिया बोलताना एमसी स्टॅनच्या शो बाबत भाष्य केले.
स्टॅनच्या गाण्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा तरुणाईवर मोठा परिणाम होणार असल्याचे मत बलोत सिंग यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच असभ्य भाषेसह स्टॅनच्या गाण्यांतून महिलांचा अपमान होत असल्याने त्याचा राग येत असल्याचे सिंग यांनी यावेळी म्हंटले. करणी सेनेने नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे, मात्र कोणी आक्षेपार्ह शब्द आणि गाणी वापरल्यास त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराही सिंग यांनी दिला
बिग बॉस जिंकल्यानंतर रॅपर स्टॅन अधिक चर्चेत आला होता. सध्या तो देशभर शोज करण्यामध्ये व्यस्त आहे. स्टॅन २८ एप्रिलला अहमदाबादमध्ये शो करणार आहे. दुसऱ्या दिवशी २९ तारखेला जयपूर, त्यानंतर ६ मे रोजी कोलकाता आणि ७ मे रोजी दिल्ली येथे त्याची लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.