कर्नाटकचे बंडखोर आमदार शक्तिपरीक्षेवेळी राहणार अनुपस्थित

मुंबई -कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी येत्या गुरूवारी शक्तिपरीक्षेला सामोरे जाणार आहेत. मात्र, त्यावेळी सध्या मुंबईत मुक्काम ठोकून असणारे सत्तारूढ आघाडीचे बंडखोर आमदार अनुपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.

आमदारांच्या बंडामुळे कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. त्यामुळे आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या कुमारस्वामी यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याचे ठरवले आहे. त्यातून ते विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव मांडणार आहेत. मात्र, आम्ही राजीनाम्यावर ठाम आहोत. त्यामुळे शक्तिपरीक्षेवेळी उपस्थित राहण्याचे कुठले कारण दिसत नाही, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली आहे. बंडखोरांपैकी 15 आमदार काही दिवसांपासून मुंबईच्या पवई भागातील लक्‍झरी हॉटेलमध्ये राहत आहेत. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सत्तारूढ आघाडीकडून सुरू आहेत.

त्यासाठी स्वत: कुमारस्वामी किंवा मल्लिकार्जुन खर्गे आणि गुलाम नबी आझाद यांसारखे कॉंग्रेस नेते बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वृत्त पसरले आहे. त्यातून बंडखोर आमदारांनी मुंबई पोलीस प्रमुखांना पत्र पाठवले आहे. कर्नाटकमधील सत्तारूढ आघाडीच्या कुठल्याच नेत्याला भेटण्याची आमची इच्छा नाही. त्यांना आमची भेट घेण्यापासून रोखावे, असे साकडे त्या पत्रात घालण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here