बंगळुरू: लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर प्रदेश कॉंग्रेस समितीच बरखास्त करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. तथापी प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या दोन्हीपदांवरील पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले आहे. प्रदेश समितीची आता पुर्ण फेररचना केली जाणार आहे.
राज्यातील कॉंग्रेस व जेडीएस आघाडी सरकारमध्ये कार्यपद्धतीवरून सध्या मोठीच धुसफूस सुरू असून सरकारच्या कार्यपद्धतीविषयी प्रदेश कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तशातच पदाधिकाऱ्यांमध्येच परस्परांच्या विरोधात वाद सुरू झाल्याने त्यावर एक नामी उपाय म्हणून प्रदेश समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या संघटन विभागाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रदेश समिती बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली. सध्या प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद दिनेश गुंडुराव यांच्याकडे आहे. त्यांना मात्र या पदावर कायम ठेवण्यात आले आहे.