बंगलुरू – कर्नाटकात सध्या बिटकॉईन गैरव्यवहारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही प्रभावशाली मंडळी सहभागी असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे.
प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री बसरवराज बोम्माई यांनी म्हटले आहे की या प्रकरणात कोणीही कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यास आम्ही कचरणार नाही. पण कॉंग्रेसने त्या तथाकथित प्रभावशाली व्यक्तींची नावे सरकारला सांगावित.
कॉंग्रेसने राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील बिटकॉईन घोटाळ्यावरून राज्यातील भाजप सरकारवर आरोप केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आमच्याच सरकारने हा घोटाळा चव्हाट्यावर आणला असून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यास आम्हाला एक सेकंदाचाही वेळ लागणार नाही.
हा घोटाळा तब्बल 5 हजार 240 कोटी रूपयांचा असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला होता. हा घोटाळा राज्यात झाला त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री बोम्माई हे गृहमंत्री होते. त्यांची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे यावर पंतप्रधानांनी भाष्य केले पाहिजे अशी मागणीही सुर्जेवाला यांनी केली होती.
या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ श्रीकी या हॅकरला आमच्या सरकारने अटक केली आहे असा दावाही मुख्यमंत्री बोम्माई यांनी केला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सुर्जेवाला यांच्याकडे जी माहिती आहे ती माहिती त्यांनी ईडीला द्यावी किंवा आमच्या सरकारला द्यावी आम्ही त्यावर तात्काळ कारवाई करू असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.