दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कर्नाटक?

महत्वाची ठिकाणे, शहरांमधील सुरक्षेत वाढ

बंगळूर – गुप्तचर यंत्रणांकडून संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, कर्नाटकमधील प्रमुख शहरांच्या आणि त्या राज्यातील महत्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर शुक्रवारी रात्री कर्नाटकमधील पोलिसांसाठी ऍलर्ट जारी करण्यात आला. त्यापाठोपाठ बाजारपेठा, मॉल, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये, बस आणि रेल्वे स्थानके अशा सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा कडक करण्यात आली. काही ठिकाणी बहुस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांकडूनही महत्वाच्या ठिकाणी संशयित व्यक्तींची आणि वस्तूंची तपासणी केली जात आहे.

अलिकडेच केंद्र सरकारने धडक पाऊल उचलताना जम्मू-काश्‍मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे चवताळून दहशतवाद्यांकडून देशात कुठेही घातपात घडवला जाऊ शकतो, असा इशारा आधीच देण्यात आला आहे. त्यातून देशभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आले आहे. अशातच गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याची माहिती पुढे आली आहे. अर्थात, तो इशारा व्यापक स्वरूपात आहे की कर्नाटकपुरता मर्यादित ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×