बंगळुरू – माय-बाप आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काय करतील याला काही सीमा नाही. कालच जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. मात्र आज कर्नाटकमधून एका बाप-लेकीचा आलेल्या फोटोने सोशल मीडियावर अनेकांची मन जिंकली.
सध्या करोना संसर्गामुळे देशभरातील शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कच्या अडचणी येतात. काही ठिकाणी मुलांना झाडावर किंवा घराच्या छतावर जाऊन ऑनलाईन क्लासला हजेरी लावावी लागते.
अशीच एक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. एक बाप आपल्या मुलींच्या ऑनलाईन क्लाससाठी मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला छत्री घेऊन उभा राहिला. फोटोमध्ये एक लेक ऑनलाईन क्लास ऐकताना दिसते तर दुसरी लेक बाजुला उभी आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच लेकीसाठी मुसळधार पावसात ढाल बनून उभा ठाकलेल्या बापाचं नेटकरी कौतुक करत आहेत. दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बालक्का गावातील हा फोटो असून मुलींच्या वडिलांचं नाव नारायण आहे.