बंगळुरू : केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्यासाठी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल मोठा हादरा ठरला. त्या पोटनिवडणुकीत कुमारस्वामी यांचे अभिनेतेपुत्र निखिल यांचा पराभव झाला. त्यातून निखिल यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक साधली गेली. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक झाली.
याआधी त्या जागा कॉंग्रेस, भाजप आणि जेडीएसकडे होत्या. कॉंग्रेसने तिन्ही जागा जिंकत भाजप आणि जेडीएस या मित्रपक्षांना धक्का दिला. त्या निकालाचे प्रमुख वैशिष्ट्य निखिल यांचा पराभव ठरला. त्यांना चन्नापटना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचे वडील कुमारस्वामी यांनी काही महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने चन्नापटनामध्ये पोटनिवडणूक झाली.
तो मतदारसंघ कुमारस्वामी यांच्या जेडीएसचा बालेकिल्ला मानला जातो. साहजिकच, सुरक्षित मतदारसंघ म्हणून जेडीएसने निखिल यांना पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवले. मात्र, त्यांना २५ हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे निखिल यांच्या नावावर सलग तिसऱ्या पराभवाची नोंद झाली. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू असणाऱ्या निखिल यांनी सर्वांत पहिल्यांदा २०१९ यावर्षीची लोकसभा निवडणूक लढवली.
मात्र, मंड्यामधील लढतीत त्यांच्या पदरी अपयश आले. त्यानंतर त्यांना मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत रामनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र, तिथेही ते पराभूत झाले.