म्हैसूर – कर्नाटकातील म्हैसूर येथे आज (17 फेब्रुवारी) एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील विश्वेश्वरय्या नगरमध्ये ही घटना घडली आहे. चेतन, त्याची पत्नी रूपाली, त्यांचा मुलगा कुशल आणि चेतनची आई प्रियंवदा अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र चेतनने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विष देऊन नंतर स्वत:ला गळफास लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस सध्या या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन (45) हे मूळचे हसन जिल्ह्यातील गोरूर गावचे रहिवासी होते. ते दुबईमध्ये अभियंता म्हणून काम करत होते आणि 2019 मध्ये म्हैसूरला परतले होते. दुबईमधून परत आल्यानंतर चेतन यांनी नोकरी सल्लागार म्हणून काम सुरू केले होते. ते पदवीधरांना दुबईतील कंपन्यांमध्ये नोकऱ्या लावून देत होते.
16 फेब्रुवारी रोजी चेतन त्यांच्या कुटुंबाला घेऊन गोरूर मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यानंतर त्या सर्वांनी चेतनच्या सासरच्या घरी जेवण केले आणि नंतर त्यांच्या घरी परतले होते. मात्र आज सकाळी चेतन, त्याची पत्नी रूपाली (43), त्यांचा मुलगा कुशल (15) आणि चेतनची आई प्रियंवदा (62) या सर्वांचे मृतदेह घरात आढळून आले.
शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, चेतनचे कुटुंब जवळपास एक दशकापासून या ठिकाणी राहत होते. ते सर्व सामान्य जीवन जगत होते आणि अलिकडच्या काळातही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या दिसून आली नाही. मात्र सर्वांनी आत्महत्या केल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे.
त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून मृत्यूचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. चेतनने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विष देऊन आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र घरात विषाचे कोणतेही निशान आढळले नाही. त्यामुळे आता फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.