पुणे – मार्केट यार्डात रत्नागिरीपाठोपाठ कर्नाटक हापूसची आवक सुरु झाली आहे, सोमवारी येथील बाजारात 43 बॉक्सची आवक झाली. रत्नागिरीप्रमाणेच कर्नाटकचाही हंगाम विलंबाने सुरू झाला असून, रत्नागिरीचा दोन महिले विलंबाने सुरू झाला होता. कर्नाटकचा मात्र 20 दिवस उशिराने आला आहे.
येथील व्यापारी भारत पंजाबी यांच्या गाळ्यावर ही आवक झाली. प्रतिडझनास हजार रुपये भाव मिळाला. गेल्यावर्षी 20 जानेवारीदरम्यान कर्नाटक हापूस आंब्याची आवक सुरू झाली होती.
सध्या काही दिवस तुरळक प्रमाणात ही आवक सुरू राहिल. मार्चपासून नियमित आवक सुरू होईल, असा अंदाज पंजाबी यांनी वर्तवला आहे. पावसाळ्यापर्यंत म्हणजे 10 जूनपर्यंत हंगाम सुरू राहील. रत्नागिरीपेक्षा कर्नाटक आंबा स्वस्तात मिळतो. त्यामुळे ग्राहक या आंब्याची आवजून वाट पाहत असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटक हापूसचे उत्पादन चांगले आहे. तसेच, बाजारात दाखल होत असलेला आंबा चांगल्या दर्जाचा असून, ग्राहकांकडूनही मागणी चांगली असल्याचे सांगण्यात आले.